सरहद , पुणे आयोजित

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे

९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्ली २०२५

शुभेच्छा संदेश

श्री. देवेन्द्रजी फडणवीस

मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

देशाच्या राजधानीत यंदा ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अभिजात मराठी भाषेचा गजर आणि साहित्यिक जागर होणार आहे. ही बाब माझ्यासारख्या मराठी साहित्यावर निर्व्याज प्रेम करणाऱ्यासाठी अतिशय आनंदाची आहे. म्हणून सुरवातीलाच ‘सरहद’ संस्था आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अभिनंदन करतो.

संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर नवी दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत हे संमेलन होत आहे, हे देखील मराठीवर प्रेम करणाऱ्यांसाठी अभिमानास्पद आहे.

मराठी साहित्य हे आपल्या संस्कृतीचे सजीव प्रतीक आहे, ज्याने काळानुसार समाजाला मार्गदर्शन केले आहे. मराठी साहित्याने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या भक्तिप्रधान आणि लोकप्रबोधन करणाऱ्या विचारांपासून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या लोकचळवळदर्शी लेखनापर्यंत आणि पु. ल. देशपांडे यांच्या विनोदावर आधारित जीवनदर्शनापर्यंत अनेक पैलूंना स्पर्श केला आहे. मराठी सारस्वतांनी भाषेचं माधुर्य दाखवताना प्रबोधनपर लेखनात मराठी वज्रासारखी किती कठीण होते हे वेळोवेळी दाखवून दिले आहे. समाजाला विचारशील बनवण्याचे कार्य केले आहे.

प्रत्येक पिढीतील बदलांना आपलेसे करण्याचे औदार्य मराठी साहित्यातून प्रकट होत आले आहे. समाजातील सर्व घटकांची भाषा आत्मसात करताना साहित्य अधिक समृद्ध आणि समकालाशी सुसंगत करणारी तरूण पिढी निर्माण होत राहिली हे मराठीचे भाग्यच आहे. आज तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे साहित्यिकांना जागतिक स्तरावर पोहोचण्याची संधी उपलब्ध झाली आहे. डिजिटल माध्यमातून मराठी साहित्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे. मुलांचाच नव्हे तर पोक्त पिढीचाही स्क्रीन टाईम वाढत असताना या सर्वांना पुन्हा एकदा साहित्याकडे वळविणे हे सोपे काम नाही, याची जाणीव आहे. त्यासाठी नव्या प्रयोगांची आवश्यकता आहे. साहित्य संमेलनातून होणाऱ्या परिसंवादातून आणि चर्चांतून याबाबत उहापोह केला जाईल, असा मला विश्वास आहे.

हे संमेलन केवळ साहित्याचा उत्सव नसून समाज प्रबोधनाचे आणि सांस्कृतिक विचारांची देवाणघेवाण करण्याचे माध्यम आहे. या व्यासपीठावरून मराठी साहित्यिकांनी सामाजिक समता, पर्यावरणीय जाणीव, आणि तरुणांच्या समस्या यांसारख्या विषयांवर चर्चा करून परिवर्तनाचा नवा अध्याय लिहावा, अशीही अपेक्षा यानिमित्ताने मी करीत आहे. ज्येष्ठ लेखिका डॉ तारा भवाळकर यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली निवड ही समकालातील मराठी साहित्यिकांच्या जाणिवांचे एकप्रकारे दर्शन घडविते. लोकसाहित्य, लोकसंस्कृती आणि लोककला हा त्यांच्या आस्थेचा, अभ्यासाचा आणि लेखनाचा विषय राहिला आहे. मौखिक स्वरूपातून प्रवाहीत होणाऱ्या साहित्याचा अभ्यास करून त्याचे सत्व त्यांनी समाजापुढे आणण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे. त्यांच्या साहित्यकृतींमधून स्त्रीवादी दृष्टिकोन आणि सामाजिक प्रश्नांवर प्रगल्भ विचारधारा नेहमीच झळाळून उठली आहे. त्यांचे विचार या संमेलनाला अधिक व्यापक बनवतील, अशी अपेक्षा व्यक्त करतो.

या संमेलनाच्या संयोजनासाठी सरहद आणि महामंडळास शासन म्हणून सर्वतोपरी पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाही देतो. राजधानी निवासी मराठी जनांसह, मराठी भाषेवर, साहित्यकृतीवर प्रेम करणाऱ्या जगभरातील रसिक आस्वादकांना पर्वणी ठरेल असा विश्वास व्यक्त करतो. या संमेलनासाठी निमंत्रित तसेच ज्येष्ठ साहित्यिक, अभ्यासक, संशोधक, रसिक वाचक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचेही या स्मरणिकेच्या माध्यमातून स्वागत करतो..! पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा!

देवेंद्र फडणवीस