महाराष्ट्राची राजभाषा असलेल्या मराठी भाषेच्या साहित्याचा उत्सव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वरूपात ह्या वर्षी देशाच्या राजधानीत साजरा होत आहे. दि. ०३ ऑक्टोबर २०२४ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याचे घोषित करण्यात आले होते. ह्या पार्श्वभूमीवर देशाच्या राजधानीत मराठी साहित्याचा गजर होत आहे हे औचित्यपूर्ण आणि आनंददायी आहे. हा आनंद व्यक्त करताना सर्वात आधी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि संमेलनाचे आयोजन करणारी ‘सरहद’ संस्था ह्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करायला हवे.
एकोणिसाव्या शतकात ११ मे १८७८ रोजी पुणे येथे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे ह्यांच्या पुढाकाराने मराठी ग्रंथकारांचे संमेलन भरवण्यात आले होते. विसाव्या शतकाच्या आरंभापासून काही काळ खंड पडला असला तरी लवकरच मराठी साहित्य संमेलन हा मराठी भाषकांचा उत्सव प्रतिवर्षी नेमाने साजरा होऊ लागला आणि ह्या वर्षी अठ्ठ्याण्णवावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आपण देशाच्या राजधानीत साजरे करत आहोत.
सुमारे २००० वर्षांपासूनची आपली भाषिक परंपरा एकविसाव्या शतकापर्यंत अव्याहत चालत आलेली आहे. हाल सातवाहनाने तत्कालीन लोकसाहित्यातील महाराष्ट्री प्राकृतातील गाथांचा संग्रह करून गाहा सतसई (गाथा सप्तशती) हा ग्रंथ रचला. ह्या लोकभाषेच्या प्रवाहाला विविध धर्मपंथाच्या साहित्याने समृद्ध केले. लीळाचरित्र आणि त्यापासून सुरू झालेली महानुभावीय साहित्याची सघन परंपरा, ज्ञानदेवी, एकनाथी भागवत, विविध संतांची अभंगवाणी आणि त्यावर तुकाबारायांच्या अभंगगाथेने चढवलेला कळस ह्यांमुळे तुकोबांच्या गाथेप्रमाणेच मराठी भाषाही लोकगंगेच्या प्रवाहासोबत वाहती राहिली. पंडित कवी आणि शाहिरांनी तिला नटवले. शिवछत्रपतींनी तिला राजभाषेचा सन्मान दिला. सामर्थ्य दिले. एकोणिसाव्या शतकात अन्य भाषांशी आणि साहित्यप्रवाहांशी संपर्क आल्याने अभिव्यक्तीच्या अनेक विधा तिने आत्मसात केल्या. पारतंत्र्यात तिने स्वातंत्र्याची प्रेरणा जागृत ठेवली आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लोकशाही बळकट करण्यासाठी ती महाराष्ट्र राज्याची राजभाषा होऊन नागरिकांच्या अभिव्यक्तीचा आधार बनली आहे. आत्मबोधापासून समाजप्रबोधनापर्यंत आणि मनोरंजनापासून अन्यायनिर्मूलनापर्यंतची विविध वैयक्तिक आणि सामाजिक कार्ये पार पाडण्यासाठी आपली भाषा आपल्याला सक्षम करत आलेली आहे.
लोकांच्या अभिव्यक्तीतून साकारलेल्या मराठी भाषेच्या साहित्याचा उत्सव आपण साजरा करत असताना त्या उत्सवाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्य, लोकसंस्कृती आणि लोककला ह्यांच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर ह्यांची निवड होणे हा एक सुखद योग जुळून आला आहे. बालकाला आत्मसात होणाऱ्या पहिल्या भाषेला मायबोली अथवा मातृभाषा म्हणतात हा केवळ योगायोग नाही. भाषेच्या आणि संस्कृतीच्या विकासात स्त्रियांचा महत्त्वाचा वाटा असतो. आपल्या अभ्यासातून ह्या योगदानाचा साक्षेपाने आढावा घेणाऱ्या डॉ. भवाळकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेले हे संमेलन मराठी साहित्य, मराठी भाषा ह्यांच्या पुढील वाटचालीत निश्चितच मार्गदर्शक ठरेल ह्यात शंका नाही.
महाराष्ट्र हे मराठी भाषकांचे राज्य आहे आणि मराठी ही ह्या राज्याच्या राजभाषापदी विराजमान आहे. ह्या राजभाषेचा राज्यात, देशात आणि विश्वात मान राखण्यासाठी लोकांनी निवडलेले शासन सदैव तत्परच राहील. ह्या संमेलनानिमित्त विविध ठिकाणाहून एकत्र येणारे सर्व साहित्यिक, संशोधक, अभ्यासक, मराठी भाषक आणि मराठी-भाषा-प्रेमी ह्यांचे ह्या मराठी भाषेच्या साहित्योत्सवात सविनय स्वागत आणि मनःपूर्वक शुभेच्छा !!!