सरहद , पुणे आयोजित

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे

९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्ली २०२५

सरहद, संमेलनाचे आयोजक

दिल्लीतील ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि ‘सरहद’ संस्था

१९५४ साली तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे झालेल्या ३७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आता ७० वर्षे झाली आहेत. मराठ्यांनी अटकेपार आपला झेंडा नेला होता या गोष्टीला त्या काळी राजकीयदृष्ट्या जितके महत्त्व होते, तितकेच महत्त्व आजच्या काळात सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्ट्या मराठी साहित्य संमेलन दिल्लीला होण्याला आहे. देशाला दिशा देणारे विचार महाराष्ट्रातून, त्यातही पुण्यातून पुढे येतात असा इतिहास असताना पुण्यातल्याच ‘सरहद’ संस्थेच्या विद्यमाने आयोजित होणारे हे आगामी संमेलन दिल्लीला होत आहे हे योग्यच म्हणायला हवे. पुणे ही देशाची वैचारिक राजधानी आहे आणि दिल्ली ही राजकीय आणि प्रशासकीय राजधानी. त्यामुळे कुठलाही विचार पुढे न्यायचा असेल, देशभर पोहोचवायचा असेल, तर तो दिल्लीमार्गे जाणे तर्कसंगतच आहे.

‘सरहद’ संस्था देशाच्या सीमावर्ती भागातल्या, विशेषतः हिंसाग्रस्त प्रदेशांमधल्या लोकांना आपुलकी, सेवा आणि मानवतेच्या मार्गाने जवळ करण्याकरता गेली तीस वर्षं कार्य करते आहे. देश जोडणे, विविध प्रदेशांमधल्या लोकांना साहित्य, संस्कृती, कला आणि सेवेच्या माध्यमातून एकत्र आणणे, हे संस्थेचे मुख्य कार्य आहे. संस्था जरी पुण्यात असली, तरी संस्थेच्या कार्याचा केंद्रबिंदू दिल्ली राहिलेला आहे. पंजाबच्या असो, काश्मीर असो वा ईशान्य भारत, संबंधित प्रश्नांकरता दिल्लीमध्ये प्रयत्न करणे, राष्ट्रपती व पंतप्रधानांपासून ते विविध मंत्रालयांशी संपर्क साधणे, वेळोवेळी संत नामदेव पुरस्कार, लल देद पुरस्कार, पुस्तक प्रकाशन असे समारंभ दिल्लीत आयोजित करणे अशा विविध कारणांकरता संस्था दिल्लीशी व दिल्लीमध्ये सुपरिचित आहे. आता तर संस्थेने दिल्लीला आपले एक केंद्रदेखील सुरू केले आहे. श्री. अतुल जैन हे तेथील कामकाज पाहतात.

आज देश आर्थिक, सामरिक, परराष्ट्रव्यवहारविषयक आणि तंत्रज्ञानविषयक क्षेत्रांमध्ये अवघे विश्व कवेत घेऊ पाहात असताना गरज आहे ती अंतर्गत सामाजिक ऐक्य टिकवण्याची आणि ते सांभाळण्याची. विविधतेत एकता, हम सब एक हैं या निव्वळ घोषणा न राहता वास्तव तसे असणे अतिशय गरजेचे आहे. यासाठी अनेक व्यक्ती व संस्था सरकारी आणि खाजगी पातळीवर कार्य करत आहेत पण हे कार्य अधिक व्यापक होणे आवश्यक आहे. जात, धर्म, पंथ आणि तत्त्वज्ञान यांच्याआधारे आपला वेगळेपणा सिद्ध करण्याऐवजी या सर्व गोष्टींचे अस्तित्त्व मान्य करूनही ‘भारत’ आणि आम्ही सारे भारतीय कसे एक आहोत, समरस आहोत हे गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्व पातळ्यांवर सिद्ध करण्याची नितांत गरज आहे. ‘सरहद’ नेमके हेच कार्य आपल्या परीने नेटाने करते आहे.

२०१५ साली ‘सरहद’ संस्थेने ८८ वे मराठी साहित्य संमेलन पंजाबमधल्या घुमान या संत नामदेवांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आयोजित केले होते. त्या गावामध्ये मराठीशी फारसा संबंध नसूनही सामान्य जनतेमध्ये या साहित्य संमेलनाबद्दल प्रचंड औत्सुक्य अनुभवाला आले. त्याचबरोबर, महाराष्ट्रातूनही हजारो साहित्यप्रेमी त्या निमित्ताने घुमानला गेले व तिथल्या लोकांमध्ये प्रेमादरपूर्वक मिसळले. त्यातून अनेकांचे ऋणानुबंध त्या गावाशी जुळले. त्या तुलनेत दिल्लीमध्ये मराठी भाषिकांची संख्या लक्षणीय आहे व आगामी साहित्य संमेलनामुळे त्यांना एक आगळा आनंद मिळेल. मराठी ग्रंथखरेदी, लेखक-कवींशी भेट अशा अनेक अंगांनी दिल्लीकर मराठी भाषिकांकरता ही एक पर्वणी ठरावी.

सरहदचे सांस्कृतिक उपक्रम

श्री. संजय नहार

अध्यक्ष, सरहद   

बुद्धीचातुर्य, कार्यतत्परता, कर्तव्यदक्षता, धडाडीवृत्ती, अष्टावधानी असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या मा. संजय नहार यांनी सन १९९७ मध्ये सरहद संस्था स्थापन केली. सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मार्गक्रमण करताना देशाच्या सीमा ओलांडून आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची मोहोर उमटवली.

काश्मीर, पंजाब आणि भारताच्या इतर सीमावर्ती प्रदेशांमध्ये दहशतवाद आणि हिंसाचारामुळे सर्वस्व गमावलेल्या अनेकांच्या अंधकारमय जीवनात प्रकाश देण्याचे कार्य मा. संजय नहार सरहद संस्थेच्या माध्यमातून करत आहेत.

वाढत्या हिंसाचाराच्या होणाऱ्या दुष्परिणामामुळे काश्मिरी मुलांना पुण्यात आणून त्यांच्या पालनपोषणाची व शिक्षणाची जबाबदारी घेतली. यातील अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन, आज वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहे.

कोणत्याही राजकीय किंवा सरकारी सहाय्याशिवाय समाजसेवेच्या ध्येयाने प्रेरित होऊन, आजवर अनेक कठीण प्रसंगांवर मात करून ध्येयवादी मा. संजय नहार कधीही मागे सरले नाहीत तर आणखी धडाडीने अविरतपणे कार्यरत आहेत.