दिल्ली ही भारताची राजधानी जशी आहे तसेच ती एक बहुसांस्कृतिक नगरही आहे. किंबहुना भारतातील व विदेशातील विविध संस्कृतींचे प्रतिबिंब तेथे पडलेले आहे. येथे होणारे सांस्कृतिक उपक्रम नंतर अवघ्या देशाला दिशादर्शक होतात असा आजवरचा अनुभव आहे.
महाराष्ट्र आणि दिल्लीचे राजकीय व सांस्कृतिक संबंध दिल्ली नगराची स्थापना तोमर वंशीय अनगपालाने केली तेव्हापासूनचे आहेत. अल्लाउद्दिन खिलजीने देवगिरीच्या यादव सत्तेचा असत घडवून आणला असला तरी मोहम्मद तुघलकाच्या काळात अल्प काळासाठी का होईना देवगिरी देशाची राजधानी बनली होती. तुघलकाने दिल्लीहून जेही नागरिक सोबत आणले होते त्यातील काही महाराष्ट्रातच स्थायिक झाले. महाराष्ट्रात सुफी पंथाचा उदय याच काळात झाला. महाराष्ट्रातील वारकरी आणि सुफी या आध्यात्मिक चळवळीने महाराष्ट्राची सांस्कृतिक भूमिका घडवायला मोठी मदत केली.
सतराव्या शतकात बाळाजी विश्वनाथ या पहिल्या पेशव्याने दिल्लीवर स्वारी करून दिल्लीचा पातशहा बदलून पुढे देशाचे भविष्य कोण घडवणार या प्रश्नाचे उत्तर दिले. पहिल्या बाजीरावाने तालकटोरा येथवर मजल मारून पातशहावर दबाव आणत आपल्या मागण्या पूर्ण करून घेऊन मागे परतला. १७५२ साली मल्हारराव होळकरांनी पेशव्यांच्या वतीने पातशहाच्या रक्षणाचा ‘अहदनामा; नामक करार केला. पानिपतचे युद्ध मराठे लढले ते दिल्लीच्या तख्ताच्या रक्षणासाठी. या काळात सदाशिवरावभाऊ पेशव्याने सानिकांचा पगार देण्यासाठी शाहे दरबाराचे चांदीचे छत फोडले पण तख्ताला तोशीस पोहोचू दिली नाही.
पुढे महादजी शिंदे या सेनानीने तब्बल वीस वर्ष पातशाहीवरच राज्य गाजवले. दोनदा पातशहाला तख्तावर बसवले १७९५ पासून पातशहा इंग्रजांच्या कह्यात गेला तर यशवंतराव होळकर यांनी १८०४ साली दिल्लीवर स्वारी करून पातशहाला मुक्त करण्याचा प्रयत्न केला. थोडक्यात मराठ्यांनी पातशाही तख्त राखण्यासाठी आणि पातशहामार्फत आपली सत्ता राबवण्यासाठी तब्बल साठहून अधिक वर्ष शिकस्त केली. भारतीय स्वातंत्र्याचे नगारेही महाराष्ट्रातूनच निनादले.
अर्थात असे असले तरी महाराष्ट्राचे दिल्लीत काय स्थान या प्रश्नाचे उत्तर बऱ्यापैकी निराशाजनक आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही. अर्थात त्यासाठी नव्याने राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक मार्गाने प्रयत्न करावे लागतील. ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे त्या दृष्टीने एक आश्वासक पाउल आहे असे म्हणता येईल. मराठी साहित्य संस्कृतीचा हा दिल्लीत होऊ घातलेला उत्सव मराठी साहित्य संस्कृतीकडे वेगळ्या दृष्टीने अवघ्या देशाला पहायला भाग पाडेल अशी आपण आशा बाळगायला हरकत नसावी.
आज दिल्लीच्या जवळपास सव्वा दोन कोटी लोकसंखेत मराठी बांधव पाच लाखांच्या आसपास आहेत. त्यांनाही मराठीच्या परिघात पुन्हा ओढून घेण्याची ही संधी आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्रलंबित असलेला मराठी अध्यासनाचा विषय या निमित्ताने मार्गाला लागेल अशीही आशा आहे कारण नुसता मराठीला अभिजात दर्जा मिळून उपयोग नाही तर अनेक विद्यापीठांत मराठी भाषेचा रीतसर अभ्यास होण्याचीही गरज आहे.
अटकेपार झेंडे लावल्याचा आम्हाला गर्व आहे. आता मराठी भाषेचे आणि मराठी संस्कृतीचे झेंडे या साहित्य संमेलनाच्या रूपाने दिल्लीत डौलाने फडकतील याचा विश्वास आहे.