सरहद , पुणे आयोजित

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे

९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्ली २०२५

अभिजात मराठीच्या निमित्ताने- २,००० वर्षांचा धावता आढावा

मराठी भाषेला अभिजात दर्जा घोषित झाल्याने ही भाषा प्राचीन, स्वतंत्र आणि मौलिक साहित्याचा प्रवाह सातत्याने दाखवणारी आहे, या निखळ सत्याचा उद्घोष झाला.

उपलब्ध पुराव्यांनुसार मराठी भाषा किमान २,२०० वर्षांपासून लिखित स्वरूपात अस्तित्वात होती. इसवी सनपूर्व २०० मधील “पाअड लख्खन सुत्त” हे वररुचीकृत व्याकरण प्राधान्याने माहाराष्ट्री प्राकृत म्हणजे प्राचीन मराठीचे व्याकरण सूत्रबद्ध कीर्ते. याचाच अर्थ महाराष्ट्रातील लोकांच्या बोलण्यात ही भाषा त्याही पूर्वीपासून समाजजीवनात नित्य व्यवहारात वापरली जात होती, हे स्पष्ट होते. इ.स.पूर्व पहिल्या शतकातील नाणेघाट, लोहगड व पाले येथील शिलालेखही उपलब्ध आहेत. याच काळात सातवाहन घराण्यातील नृपती हालाने संपादित केलेला गाथा सप्तशती (गाहा सतसइ) हा काव्यग्रंथ तत्कालीन समाजजीवनाच्या भावभावनांचे मनोरम दर्शन घडवतो. या संग्रहात किमान २८ कवयित्रींच्या रचनांचा समावेश आहे, हे एक विशेष. त्यानंतर जैन आचार्य विमल सुरी यांनी सन ६ मध्ये “पउमचरिय” हे रामकथेवरील आद्य महाकाव्य लिहिले. तेव्हापासून साहित्याचा सलग प्रवाह आपल्याला आढळून येतो. मग ते तिसऱ्या शतकातील आद्य प्रवासकथात्मक वासुदेव हिंडी असो की उपकास कथा धुर्ताख्यान असो, लिलावइ सारखे प्रेमकथा असलेले महाकाव्य असो की कुवलयमाला यासारखी अद्भुतरम्य प्रेमकथा असो, असे विविधांगी, जीवनाच्या अनेक पैलूंना स्पर्श करणारे साहित्य मराठीत लिहिले गेले.

कालौघात भाषा विकसित होत जातात आणि तेच जिवंत भाषेचे लक्षण असते. सातवाहनकालीन मराठीही कालौघात बदलत राहिली. या बदलाच्या खुणा आपल्याला प्रत्येक शतकातील साहित्यात दिसून येतात. बाराव्या शतकातील महान कवी मुकुंदराज हे आधुनिक मराठीचे उद्गाते म्हणता येतील. ते जुनी मराठी आणि नव्या मराठीतील दुवा ठरले. ज्ञानेश्वर ते तुकाराम असा सलग संतसाहित्याचा प्रवाह मराठीच्या प्रागतिक होत जाण्याचा पुरावा आहे. बखरी व तत्कालीन पत्रव्यवहारही समाजजीवनात बोलण्यात असलेल्या मराठीचे दर्शन घडवतात.

आज मराठीने आधुनिक रूप धारण केले आहे. आजचे मराठी साहित्य हे मानवी संवेदनांना, आशा-आकांक्षांना कवेत घेत सर्व आधुनिक साहित्याचे प्रकार हाताळत मराठी भाषेचे वैभव वाढवत आहेत.

मराठी भाषेने अन्य भाषांतील शब्द स्वत:चे रूप देऊन जसे स्वीकारले तसेच अन्य भाषांनाही शब्द उधार दिले. असे असले तरी मराठी भाषेची मूळ प्रवृत्ती मात्र प्राचीन काळापासून आजतागायत अखंड व सलग राहिल्याचे आपल्याला दिसते.

केंद्र सरकारने रंगनाथ पठारे समितीचा अहवाल स्वीकारून मराठी भाषा स्वतंत्र असल्याची खात्री दिल्याने अर्थातच मराठी भाषकांच्या आत्मसन्मानात भर पडलेली आहे. मराठी भाषेचे संवर्धन होण्याला त्यामुळे निश्चितच मोलाची मदत होणार आहे.