जी भाषा ज्ञानात्मक विचार, सिद्धांत आणि व्याख्या समर्थपणे मांडू शकते त्या भाषेला ज्ञानभाषा म्हटले जाते. मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यास समर्थ नाही, असे काही लोक म्हणत असतात. त्यांचा मराठी भाषेचा इतिहास आणि ज्ञान म्हणजे नेमके काय, याबाबत गोंधळ असतो.
ज्ञानाच्या कवेत जीवनातील सर्वच क्षेत्रे येतात. ती काव्यापासून सुरू होऊन तत्त्वज्ञान आणि विज्ञान यापाशी संपते. प्राचीन मराठीत निर्माण झालेला वररुचीचा व्याकरण ग्रंथ ज्ञानविचार देणारा नव्हता, असे कोण म्हणेल? संघदास गणी यांच्या वासुदेव हिंडी या तिसऱ्या शतकातील ग्रंथात कथेच्या ओघात तत्कालीन व्यापाराच्या पद्धती, व्यापारी तांडे, व्यापारी श्रेण्या ते प्राचीन देशांतर्गत व देशाबाहेर जाणाऱ्या व्यापारी मार्गांची माहिती येते व तत्कालीन अर्थव्यवस्था आणि समाजजीवन याचे मार्गदर्शन होते. समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र याबरोबरच भूगोलशास्त्राची वास्तविक माहिती ही ज्ञानाच्याच कक्षेत येते, हे आपण लक्षात घ्यायला हवे. खरे म्हणजे अशा प्रकारचा ग्रंथ त्या काळात ग्रीक भाषा वगळता अन्य भाषांत लिहिला गेलेला नव्हता हेही या ग्रंथाचे वैशिष्ट्य. संत ज्ञानेश्वरांचा अमृतानुभव हा तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातील एक मौलिक ग्रंथ आहे. आधुनिक काळात गजानन क्षीरसागर ते डॉ. जयंत नारळीकर आणि डॉ. संजय ढोले यांनी नुसत्या स्वतंत्र विज्ञान कथा लिहिल्या नाहीत, तर विज्ञानावर मूलभूत संशोधनही काही प्रमाणात विशद केले आहे. नीतिशास्त्र या ज्ञानशाखेला वाहिलेले ग्रंथ लो. टिळक, दि. के. बेडेकर ते संजय सोनवणी यांनी मराठीतच लिहिले आहेत आणि ते अनुवाद नाहीत ही बाबही लक्षात घेतली पाहिजे. थोडक्यात, मराठी ही ज्ञानभाषा आहे व तीत अजून मौलिक ज्ञान निर्माण होण्याची संभावना आता अभिजात दर्जा मिळाल्यानंतर निर्माण झाली आहे.
मराठी भाषेत आजमितीला किमान ६० बोलीभाषा आहेत आणि त्यांतील प्रत्येक बोलीभाषेत लोकसाहित्याचा मोठा संभार आहे. या सर्व भाषा मराठीचे सौंदर्य तर वाढवतातच, पण स्थानिक लोकसंस्कृतीचे रूपही दाखवतात. लोकसाहित्याचे संकलन आणि त्यावर अभ्यास करणाऱ्या विद्वानांची डॉ. सरोजिनी बाबर ते आताच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर अशी एक मोठी फळी तर आहेच, पण विद्यापीठीय पातळीवरही यात सातत्याने संशोधन व अभ्यास सुरू असतो.
मराठी साहित्याला तर प्रदीर्घ पार्श्वभूमी आहे. प्राचीन मराठी काव्यरचना व महाकाव्य आपल्याला हाल सातवाहनाचे गाथा सप्तशती, पादलिप्ताचार्यांचे महाकाव्य तरंगवइ, उपहास कथा धुर्ताख्यान, बाबा पदमनजी यांची आधुनिक शैलीतील मराठीतील कादंबरी यमुना पर्यटन ते आजचे वर्तमानातले भालचंद्र नेमाडे, प्रवीण बांदेकर, रंगनाथ पठारे, विश्वास पाटील, शरणकुमार लिंबाळे यासारखे साहित्यिक मराठीची शोभा वाढवत आहेत. विजय तेंडुलकर ते प्रेमानंद गज्वींसारखे नाटककार राष्ट्रीय पातळीवर गाजलेले आहेत.
कोशरचनांतही मराठी भाषा देशात अग्रक्रमावर राहिलेली आहे. थोडक्यात, मराठी भाषेने हाताळलेला नाही असा कोणताही वाङ्मयप्रकार अथवा ज्ञानसाहित्य प्रकार उरलेला नाही.