सरहद , पुणे आयोजित

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे

९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्ली २०२५

शुभेच्छा संदेश

श्री. नितीनजी गडकरी

मंत्री, रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभाग, भारत सरकार

मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर आणि महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर प्रथमच नवी दिल्लीत ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब होय. या संमेलनात येणाऱ्या सर्व मराठी साहित्यिकांचे तसेच साहित्य रसिकांचे मन:पूर्वक स्वागत आणि या संमेलनाचे आयोजन करीन असलेल्या सरहद ( पुणे ) संस्थेला हार्दिक शुभेच्छा.

अखिल भारतीय स्तरावर साहित्य संमेलन भरवण्याची परंपरा मराठी साहित्याच्या क्षेत्रात आहे. ती परंपरा ९८ वर्षे पूर्ण करीत असून, लवकरच संमेलनाच्या शताब्दीचा सोहळा होईल, याचा आनंद वाटतो. १९५४ साली दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित केले गेले होते. थोर राजनीतिज्ञ, साहित्यिक व अर्थशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेले श्री. काकासाहेब गाडगीळ त्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. प्रख्यात कोशकार व सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक-संशोधक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्या संमेलनाचे उद्घाटन केले होते. दिल्लीत साहित्य संमेलन आयोजित करण्याचा योग सत्तर वर्षांनी आला आहे. सरहद संस्थेने या संमेलनाच्या पाश्र्वभूमीवर, मराठी अस्मितेचा राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार करणारे थोर व्यक्तिमत्त्व सर चिंतामणराव देशमुख यांच्या नावाने पुरस्कार सुरू करण्याचे औचित्य साधले, याची मला कल्पना आहे.

आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत हे संमेलन होते आहे, याचा पुनरुल्लेख यासाठी करावासा वाटतो की, जागतिक स्तरावर स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी मराठी भाषेला आता भरपूर संधी उपलब्ध होणार आहेत. सकस साहित्याच्या माध्यमातून माय मराठीने अनेक पिढया घडविल्या. आता मराठी साहित्यिकांनी जागतिक स्तरावर पोहोचण्याचे स्वप्न पाहिले पाहिजे. देशाच्या राजधानीत होत असलेल्या संमेलनातून मराठीला ज्ञानभाषा बनविण्याच्या प्रक्रियेचा श्रीगणेशा व्हावा, हीच अपेक्षा.

संमेलनाच्या यशस्वीतेसाठी खूप खूप शुभेच्छा.

आपला

नितीन गडकरी