अध्यक्ष,
९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन,
दिल्ली २०२५
९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर (जन्म १ एप्रिल. १९३९) या मराठी लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि लोककला या विषयांच्या गाढ्या अभ्यासिका असून त्यांनी स्त्री-जाणिवांना प्रखर प्रकाशात आणण्याचेही अमूल्य कार्य केलेले आहे. याशिवाय त्यांनी नाट्यशास्त्रावर संशोधन व संतसाहित्याचाही सखोल अभ्यास केला असून त्यांनी अन्य संशोधनात्मक पुस्तकांशिवाय एकांकिका, ललित निबंध असे विपुल लेखन केले आहे व या विषयांशी संबंधित अनेक चर्चा, परिसंवाद, संमेलने यांत सहभाग घेतला आहे.
समाजजाणीवांशी एकरूप होत त्यांनी पौराणिक नाटक, लोकनाट्य, दशावतार, तंजावरची नाटके, यक्षगान, कथकली अशा नाट्य प्रकारांची जडणघडण शोधत त्याचा सामाजिक अन्वयार्थ लावण्याचेही महत्वाचे कार्य त्यांनी केलेले आहे. त्यांचे समग्र लेखन वस्तुनिष्ठ, यथार्थ व चिकित्सक दृष्टी आणि सैद्धांतिक अभ्यासाचा वस्तुपाठच आहे असे म्हटले तरी चालेल.
मराठी विश्वकोश, मराठी वाड्मयकोश आणि मराठी ग्रंथकोश या महत्त्वाच्या कार्यातही त्यांनी बहुमोल योगदान दिले आहे. महाविद्यालयात शिक्षण घेत असतांनाच त्यांनी हरिवंशराय बच्चन यांच्या मधुशालाचे मराठीतले पहिले भाषांतर केले होत्रे व साहित्य जगताशी नाळ जुळवली होती. त्यांनी विद्यार्थीदशेतच नाट्य एकांकिका स्पर्धांसाठी लेखन, दिग्दर्शन, व अभिनयही केला होता. शिक्षण संपल्यावर त्यांनी स्वतःची ए.डी.ए. ही नाटक संस्था सुरू केली. त्या संस्थेच्या माध्यमातून शाळा- कॉलेजच्या मुलांची नाटके बसवून दिली आणि त्यांना राज्य नाट्य एकांकिका स्पर्धेसाठी तयारी करून दिली, हे त्यांच्या कलेविषयीच्या प्रगल्भ जाणीवा दर्शवते. येथेच न थांबता त्यांनी ‘नाटककार विष्णुदास भावे आणि मराठी पौराणिक नाटकाची जडण-घडण (प्रारंभ ते १९२०) ‘हा प्रबंध लिहून पीएच्.डी. मिळवली.
हे कार्य करत असतांनाच तारा भवाळकर या लोकसंस्कृतीच्या अभ्यासाकडे वळाल्या आणि आजवर लोकसाहित्यातील दुर्लक्षित राहिलेल्या पैलूंवर प्रकाशझोत टाकणारे मूलगामी संशोधन केले. त्यातून अनेक ग्रंथ निर्माण झाले. ‘स्त्रीमुक्तीचा जागर’ यासारखे वैचारिक पुस्तक लिहून त्यांनी स्त्रीजाणिवांना एक शास्त्रबद्ध रूप दिले.
शिक्षिका ते प्राध्यापिका हा प्रवास पूर्ण करत असतांना त्यांची संशोधनाची साथ धरली आणि स्त्रीमुक्ती आणि लोकसंस्कृती त्या दोन्ही क्षेत्रांतील अनुबंध जपला, हे त्यांचे मोठेच वैशिष्ट्य होय.
अशा व्यासंगी, प्रगल्भ साहित्य निर्मिती करणाऱ्या डॉ. तारा भवाळकर यांची निवड ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी झाली हा महाराष्ट्रातील लोकसंस्कृती आणि स्त्रीवादाचा सन्मान मानला जातो आहे.