सरहद , पुणे आयोजित

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे

९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्ली २०२५

स्वागताध्यक्ष

पद्मविभूषण मा. शरद पवार

स्वागताध्यक्ष,
९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्ली 

ज्येष्ठ नेते शरद पवार हे जनमानसाची नस जाणणारे व्यासंगी राजकारणी म्हणून ओळखले जातात. तब्बल ५ दशकांहून अधिक काळ संसदीय राजकारणाचा अनुभव त्यांच्या पाठीशी असून महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री तसेच केंद्र सरकारमध्ये संरक्षणमंत्री व कृषीमंत्री पदे त्यांनी भूषवली आहेत. सध्या ते राज्यसभेचे खासदार आहेत. राजधानी दिल्लीमध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाचा प्रदीर्घ आणि मोठा प्रभाव राखणाऱ्या निवडक आणि वलयांकीत मराठी व्यक्तिमत्वांमध्ये शरद पवार यांचे नाव अग्रस्थानी आहे. सन २०१७ मध्ये भारत सरकारच्या वतीने त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.

राजकारणापलीकडे, शरद पवार यांची स्वतःची निराळी प्रतिमा आहे. ते व्यासंगी वाचक, चिंतक आणि भाष्यकारदेखील आहेत. साहित्याचा आणि त्यांचा निकटचा संबंध राहिलेला आहे. एक उत्तम वाचक ही ओळख देखील ते अभिमानाने मिरवतात. महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील साहित्यिक आणि सांस्कृतिक वर्तुळाशी त्यांचे अतिशय आत्मीयतेचे संबंध राहिलेले आहेत. कित्येक दिग्गज साहित्यिकांशी त्यांचे असणारे स्नेहसंबंध तर सर्वश्रृत आहेत. गदिमा, पु.ल. देशपांडे, ना.धों. महानोर यांपासून ते अगदी अलीकडच्या काळातील तरुण साहित्यिकांशीही त्यांचा कायम संवाद राहिलेला आहे. साहित्य संस्कृतीतील उच्च मूल्यांची पाठराखण करतानाच नव्या आणि प्रागतिक विचारांचे स्वागत करण्याची त्यांची कायम भूमिका राहिलेली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांमध्ये आजवर त्यांनी ४ वेळा (छत्रपती संभाजीनगर, नाशिक, चिपळूण आणि सासवड येथील संमेलनांमध्ये) उद्घाटक म्हणून भूमिका बजावली आहे. सरहद संस्थेने पंजाब येथील घुमान येथे आयोजित केलेल्या ८८ व्या अ.भा. मराठी साहित्य संमलन यशस्वी होण्यासाठी पवार साहेबांनी भक्कम पाठबळ दिले होते, हे इथे उल्लेखनीय.

या पार्श्वभूमीवर, यंदा दिल्लीमध्ये होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ते प्रथमच स्वागताध्यक्षपदाच्या भूमिकेत असणार आहेत. त्यांचा आजवरचा प्रदीर्घ अनुभव, साहित्य-संस्कृतीशी असणारे घट्ट नाते आणि दिल्ली-महाराष्ट्राच्या संबंधांची असणारी समृद्ध जाण यांमुळे स्वागताध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली.